Article: इस्लाममध्ये मुक्तिची धारणा आणि त्यासाठी आवश्यक असलेले कर्मइस्लाममध्ये मुक्तिची धारणा आणि त्यासाठी आवश्यक असलेले कर्म


जिवनाचा दृष्टिकोन 

~~~~
        सृष्टीच्या निर्माणकर्त्याने मानवाला सदाचार अथवा दुराचार दोन्हीपैकी कोणतेही कर्म करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे आणि दोन्ही प्रकारच्या कर्माचे वेगवेगळे फळ ठरविलेले आहे .
       वर्तमान जग हे परिक्षा केंद्र आहे तर न्यायनिवाड्याचा दिवस [ कयामत ] निकालाचा दिवस आहे .वर्तमान जग हे कर्मस्थळ आहे तर पारलौकिक जिवन हे बक्षिस किंवा शिक्षा मिळण्याचे ठिकाण .
       परिक्षा गृहामध्ये वेळेचे बंधन असते .प्रश्नपत्रिका सोडविण्याऐवजी मौजमजा करण्यात वेळ घालविणे निश्चितच आपले नुकसान करणे आहे .प्रत्येक माणसाला फक्त एकदाच आपापल्या जिवनाची परिक्षा द्यायची आहे .मृत्यूनंतर पुन्हा दुसरा कोणताच जन्म नाही .

 इस्लाममध्ये मुक्तिची धारणा 

  ~~~~~~
        कयामतच्या दिवशी जेव्हा संपूर्ण मानवजातीला अल्लाहच्या न्यायालयात हजर केले जाईल जिथे प्रत्येक माणसाला आपल्या कर्माचा जाब द्यावा लागणार आहे , त्या वेळी अल्लाह आपल्या कृपादृष्टीने ज्या लोकांच्या अपराधाना क्षमा करेल आणि त्यांच्या एकंदरीत कामगिरी वर प्रसन्न होऊन त्यांना स्वर्गात दाखला देईल ,याला इस्लाममध्ये मुक्ति मिळविणे असे म्हटले आहे .ईश्वराच्या प्रकोपापासून आणि नरकाग्नीपासून मुक्तता मिळणे हीच ' वास्तविक मुक्ति ' आहे .
        इस्लाममध्ये मुक्तिची अत्यंत अर्थपुर्ण , व्यापक आणि स्पष्ट धारणा आहे मरणोत्तर जिवनात माणसाला मिळणारी मुक्ति त्याच्या वर्तमान जिवनातील कामगिरी वर आधारित असल्याचे सांगितले गेले आहे .
          जसे परिक्षेत उत्तिर्ण होण्यासाठी काही किमान गुणांची आवश्यकता भासते तसेच मुक्ति प्राप्तीसाठी प्रत्येक माणसाला किमान चार कर्माची आवश्यकता असल्याचे कुरआन मध्ये सांगितले गेले आहे .

वेळेचे महत्त्व आणि इतिहासाची साक्ष 

~~~~~~~~~
        कुरआन मध्ये  [१०३/१] सुरूवातीला हे स्पष्ट सांगितले गेले आहे की ,माणसाचे जिवन या जगात अत्यल्प काळापुरते मर्यादित आहे .आणि ही मुद्दत उघडयावर ठेवलेल्या बर्फासारखी शिघ्रतेने संपणारी आहे .ज्याप्रमाणे बर्फाचा वापर न केला गेल्यास तो विरघळून वाया जातो व नुकसान होते अगदी त्याचप्रमाणे माणसाने आयुष्यातील वेळेचा लाभ घेऊन मरणोत्तर जिवन सफल करण्याकरिता प्रयत्न केले नाही तर निश्चितच मरणोत्तर जिवनाबरोबर सध्याच्या जिवनातही तो तोट्यात राहील
.      मानव इतिहास साक्षी आहे . ज्या ज्या समाजाने ईश आदेशाच्या विरुध्द आपली मनमानी केली , अत्याचार व अन्यायाचा मार्ग अवलंबून जगात हाहाकार माजवला ,त्यांच्यावर ईश्वराचा प्रकोप प्रकटला .त्या प्रकोपाच्या खाणाखूणा आजही आपल्या डोळ्यासमोर आहेत .आणि मरणोत्तर जिवनात जे भोगावे लागतील ते तर निश्चितच आहे .

कायमच्या विनाशापासुन सुरक्षित  राहणारे कोण  ?

~~~~~~~~
       कुरआन मध्ये [ १०३ / ३ ] अशा विनाशापासून सुरक्षित राहू इच्छिणाऱ्या माणसांना आवश्यक असलेले कर्म स्पष्टपणे सांगितले गेले आहे .

1) श्रद्धा -----


            जे लोक संपूर्ण सृष्टीचा निर्माणकर्ता व एकमेव मालक , पालक ,शासक असलेल्या "अल्लाह" वर श्रद्धा ठेवतात .त्याच्या अस्तित्वात व गुणात कुणालाही भागीदार ठरवित नाहीत .फक्त त्याच्याच आदेशाचे पालन करून , नतमस्तक होऊन आपले भक्तीभाव व प्रेमभाव व्यक्त करतात .

2) सत्कर्म -------


             जे दूराचारापासून दूर राहून सदाचाराचा मार्ग पत्कारतात .प्रत्येकाचा हक्क आपली कर्तव्ये मानून आनंदाने ती पार पाडतात .अल्लाहचा हक्क , आईवडीलाचा हक्क ,शेजारीचा , नातेवाईकाचा ,गरीब व लाचाराचा हक्क आणि प्रत्येक जिवाचा हक्क .प्रत्येकाशी न्यायनिष्ठेने व आदराने वागतात .आणि जगात न्याय व सत्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असतात .

3) एकमेकाला सत्याचा उपदेश ----


     या निष्ठावन्त लोकांनी स्वतः साठी जो सदाचाराचा मार्ग निवडला त्याचीच शिकवण व उपदेश ते ऐकमेकाना देत असतात आणि दुराचारापासुन ऐकमेकाना रोखून सुधारणेचा प्रयत्न करतात .

4) संयम आणि सहनशिलता ------


      आणि ही वाटचाल करताना त्यांच्यावर कितीही संकटे आली ,कसल्याही अडचणी निर्माण झाल्या ,कितीही कष्टाना तोंड द्यावे लागले आणि कोणताही त्याग करावा लागला तरीही त्यासाठी लागणारी सहनशिलता ,दृढता, धैर्य ,निर्धास्तता आणि संयम ते ठेवतात._____________________________________
अब्दुल कय्यूम शेख अहमद
9730 25 4636
लेखन विभाग
जमात ए इस्लामी हिंद
औरगाबाद - महाराष्ट्र

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget